कराची- कोरोना लढ्याच्या मदतनिधीसाठी भारत-पाकिस्तान यांच्यात मालिका खेळवण्याचा पर्याय पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सुचवला आहे. त्यांच्या या पर्यायाला भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी विरोध दर्शवला. कपिल यांनी भारताला निधीसाठी क्रिकेट खेळवण्याची गरज नाही, तर मदनलाल यांनी क्रिकेटचा निर्णय केंद्र सरकार घेईल, असे म्हटले होते. आता या मुद्द्यावरुन शोएब अख्तरने कपिल देव यांना टोला लगावला आहे.
शोएबने एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, 'मला काय म्हणायचे आहे हे कपिल भाईंना समजलेले नाही. कोरोनामुळे प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे सर्व मुद्दे बाजूला ठेवून पैसा कसा निर्माण होईल याचा विचार करणे सद्य घडीला गरजेचे आहे. भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी, जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या उड्या पडतात. कपिल भाईं म्हणले की, आम्हाला पैशाची गरज नाही, कदाचित त्यांना पैशांची गरज नसेल पण इतरांना नक्कीच आहे. मला वाटतं की, मी सुचवलेल्या पर्यायाबाबत नक्कीच भविष्यात विचार केला जाईल.'
क्रिकेटच्या सामन्यांवर ज्यांच्या कुटुंबाचा गाढा असणारे अनेक लोकं आहेत. जर पुढील सहा महिन्यांत क्रिकेट सामने झाले नाही तर त्या परिवारांचे काय होणार हे आपण सांगू शकतो का? त्यामुळे मी परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर ही मालिका खेळवावी, असा विचार व्यक्त केला. या मालिकेमुळे भविष्यात नक्कीच दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यास मदत होईल, असेही शोएब म्हणाला.