लाहोर -क्रिकेटमधील सर्वात कठीण टप्प्यात सचिनने अनेक विक्रम रचले. त्याची तुलना सध्याचा भारतीय कर्णधार विराट कोहलीशी करणे चुकीचे ठरेल, असे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने म्हटले आहे. विराट हा सचिनचा उत्तराधिकारी मानला जातो. त्याने सचिनचे अनेक विक्रम मोडले आहेत.
एका अॅपवर बोलताना अख्तर म्हणाला, "सचिनने क्रिकेटच्या सर्वात कठीण टप्प्यात फलंदाजी केली आहे. जर आता संधी मिळाली असती तर त्याने 1.30 लाख धावा केल्या असत्या. त्यामुळे सचिन आणि कोहली यांच्यात तुलना करणे योग्य नाही."
2003च्या विश्वकरंडक स्पर्धेत सचिन तेंडुलकरला बाद केल्यामुळे आपण दु:खी असल्याचेही अख्तरने म्हटले आहे. सचिनचे शतक दोन धावांनी हुकले होते. भारताने सामना सहा विकेट्सने जिंकला.
शोएब म्हणाला, "मी खूप दुःखी होतो कारण सचिन 98 धावांवर बाद झाला होता. ही एक विशेष खेळी होती आणि त्याने शतक ठोकले पाहिजे होते. त्याने शतक करावे असे मला वाटत होते. माझ्या बाऊन्सरवर त्याने षटकार मारला असता तर मला आनंद झाला असता. यापूर्वी त्याने केले होते." सचिनने 75 चेंडूत केलेल्या या खेळीत 12 चौकार आणि एक षटकार खेचला होता.