नवी दिल्ली - अक्षय कुमारचा चित्रपट 'हाऊसफूल ४' कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहे. अक्षयने या चित्रपटात साकारलेला 'बाला' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. याच बालाची भूरळ टीम इंडियाचा गब्बर शिखर धवनला पडली आहे. त्याने बालाची अॅक्टिंग करतानाचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
दुसरा टी-२० सामना जिंकत टीम इंडियाने बांगलादेश विरुध्दच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. टीम इंडियाने हा सामना सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माच्या दमदार भागिदारीमुळे जिंकला. मालिकेत बरोबरी साधल्याने, टीम इंडिया रिलॅक्स झाल्याचे दिसून येत आहे. कारण खेळाडू विजयानंतर संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी मस्ती करताना दिसून आले. याच मस्तीचा व्हिडिओ धवनने शेअर केला आहे.
धवनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गोलंदाज खलील अहमद तसेच युजवेंद्र चहल दिसत आहे. यात खलील धवनला विचारतो. रोहित शर्माने दिलेले नविन ग्लोज कोठे ठेवले आहेत. तेव्हा चहल त्यांच्या हातात असलेला घंटा वाजवतो आणि धवन खलीलने विचारलेला प्रश्न विसरतो, अशी अॅक्टिंग धवन करताना दिसत आहे.