शारजाह - यंदाच्या आयपीएलमध्ये 'डबल-हेडर'चा दुसरा सामना कोलकाता आणि दिल्ली यांच्यात रंगला. या सामन्यात दिल्लीने कोलकातावर १८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात दिल्लीकडून क्षेत्ररक्षण करताना सलामीवीर शिखर धवनने कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकचा अप्रतिम झेल घेतला.
दिल्लीच्या २२९ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक १० व्या षटकात फलंदाजी करायला आला. या लीगमध्ये अपयशी ठरत असलेला कार्तिक या सामन्यातही आपली छाप पाडू शकला नाही. १३ व्या षटकात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर शिखर धवनने कार्तिकचा अप्रतिम झेल घेतला. पाहा व्हिडिओ -
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव करत गुणातालिकेत अव्वल स्थान काबिज केले. कोलकाताची या पराभवामुळे पाचव्या स्थानावर घसरण झाली. कोलकाताने चार सामने खेळले असून यात दोन विजय तर दोन पराभव झाले आहेत.
कोलकाताच्या पराभवानंतर कर्णधार दिनेश कार्तिकवर टीका करण्यात येत आहे. तर, कार्तिकची कर्णधारपदावरून हकालपट्टी करत त्या ठिकाणी इयान मॉर्गनची निवड केली पाहिजे, असे अनेकांनी मत व्यक्त केले आहे. कार्तिक फलंदाजीत मुंबईविरुद्धचा सामना वगळता दुहेरी आकडा गाठू शकलेला नाही. मुंबईविरुद्ध त्याने ३० धावा केल्या होत्या. त्यानंतरच्या तीन सामन्यात तो शून्य, १ आणि ६ धावांवर बाद झाला. कोलकाताचा पुढील सामना ७ ऑक्टोबरला चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे.