मुंबई - ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान न मिळालेल्या सूर्यकुमार यादवने, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरूद्धच्या सामन्यात दमदार फलंदाजी करत पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची दखल घेण्यास सर्वांना भाग पाडलं. सूर्यकुमारने अखेर पर्यंत मैदातानात तळ ठोकत, नाबाद ७९ धावांची खेळी करत मुंबईला विजय मिळवून दिला. या विजयानंतर मुंबईने आपलं स्थान जवळपास निश्चीत केले आहे. दरम्यान सूर्यकुमारची फलंदाजी पाहून न्यूझीलंडच्या माजी खेळाडूने एक ऑफर दिली आहे.
न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्कॉट स्यायरिस याने सूर्यकुमार यादवला वेगळ्या संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला आवडेल का? अशी विचारणा केली आहे. सूर्यकुमारने बंगळुरूविरूद्ध केलेल्या जबरदस्त फलंदाजीनंतर स्कॉट स्टायरिसने ही विचारणा केली.
स्कॉट स्यायरिसने या संदर्भात एक ट्विट केले आहे. यात त्याने, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या इच्छेपोटी सूर्यकुमार यादवने कदाचीत दुसऱ्या देशाकडून खेळण्याचा निर्णय घेतला तर... कदाचित न्यूझीलंड देखील..., असे म्हटलं आहे.
दरम्यान, सूर्यकुमार यादवने दमदार कामगिरी करून देखील त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय निवड करण्यात आलेली नाही. निवड समितीच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.