मुंबई- पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक तसेच इतर कोणत्याही स्पर्धेत पाकसोबत खेळू नये, अशी मागणी मोठ्या प्रमाणात भारतीयांसह क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे भारताचे माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानसोबत खेळावे, असे मत व्यक्त केले आहे.
विश्वचषकात पाकसोबत खेळण्यावरून सचिन तेंडुलकरचे मोठे वक्तव्य - विश्वचषक
इंग्लंडमध्ये ३० मेपासून विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे.
सचिन म्हणाला की, विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानसोबत न खेळून त्यांना २ गुण का द्यावेत, त्यापेक्षा पूर्ण जगासमोर विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करून भारताने बदला घ्यावा. सध्याचा भारतीय संघ खूप मजबूत आहे. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात पाकवर विजय मिळवून भारताने त्यांना धूळ चारावी, असेही सचिन म्हणाला. मात्र असे असले तरी आपला देश या प्रकरणात जो निर्णय घेईल तो योग्य असेल, असेही तो म्हणाला. यापूर्वी सुनील गावस्कर यांनीही अशीच भूमिका घेतली होती.आज झालेल्या प्रशासकीय समिती आणि बीसीसीआयच्या बैठकीत या प्रकरणात कोणताही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे विश्वकरंडकात भारत -पाक सामना होणार की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेले नाहीय. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत १६ जूनला इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारत-पाक यांच्यातील सामना खेळण्यात येणार आहे. इंग्लंडमध्ये ३० मेपासून विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे.