मुंबई - विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सपाटून पराभव स्वीकारावा लागला. यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यामध्ये त्या पराभवाची परतफेड केली. आता विराट आणि अजिंक्य यांच्या नेतृत्वाची तुलना केली जात आहे. यात अनेक खेळाडू आपापले मत मांडताना पाहायला मिळत आहेत. भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुरकरने देखील यावर त्याचे मत व्यक्त केले आहे.
सचिनने नुकतीच पीटीआयला मुलाखत दिली आहे. यात सचिनला विराट आणि अजिंक्य यांच्या नेतृत्वाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा यावर सचिन म्हणाला, 'लोकांनी विराट आणि अजिंक्य यांच्यात तुलना करू नये. अजिंक्यचे व्यक्तिमत्व वेगळे आहे. मी त्या लोकांना आठवण करून देईन की, दोघेही भारतीय आहेत आणि ते भारतासाठी खेळतात. अशात कोणत्याही व्यक्तीला भारताच्यावर ठेवलं नाही पाहिजे. संघ आणि देश सर्वात आधी आहे.'
दरम्यान, भारतीय संघाने २०१९ या वर्षात विराट कोहलीच्या नेतृत्वात तीन सामने खेळली आहेत. या तिनही सामन्यात भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने वर्षाअखेरीस एक सामना खेळला. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. रहाणेने २०१९ या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जास्त धावा जमवल्या आहेत. यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावलेल्या शतकाचा समावेश आहे.