मुंबई - 'हिटमॅन' रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पण त्यासाठी रोहितला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. यात तो पास झाला तर त्याचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याचा मार्ग मोकळा होईल.
रोहित शर्माला दुखापतीचे कारण देत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघातून वगळण्यात आले होते. या विषयावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, आता रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. भारतीय संघ आयपीएल संपल्यानंतर दुबईतूनच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यात दौऱ्यात उभय संघात ३ टी-२०, ३ एकदिवसीय आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. १७ नोव्हेंबरला या दौऱ्याला सुरूवात होईल.
आधीच झाली आहे संघाची घोषणा
निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा मागील आठवड्यात केली आहे. यात रोहितला वगळून केएल राहुलकडे उपकर्णधारपद देण्यात आले. या विषयावरुन बीसीसीआयने सांगितले होते की, 'त्यांची मेडिकल टीम रोहितच्या फिटनेसवर लक्ष ठेऊन होती. तो खेळण्यासाठी फिट नसल्याने त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते.'
महत्वाची बाब म्हणजे, निवड समितीने संघाची घोषणा ज्या दिवशी केली, त्याच दिवशी सायंकाळी रोहित नेटमध्ये सराव करताना पाहायला मिळाला. आता यावर बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, जोपर्यंत रोहित शर्मा फिटनेस टेस्ट पार करत नाही. तोपर्यंत त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाता येणार नाही. ही टेस्ट भारतीय संघाचे फिजिओ नितिन पटेल घेतील. नितीन पटेल आणि एनसीए रोहितला फिट ठरवणार नाहीत, तोपर्यंत रोहितची संघात वापसी होणार नाही.
हेही वाचा -IPL २०२० : पहिल्यादांच अंतिम फेरी गाठल्यानंतर अय्यर म्हणाला...
हेही वाचा -Women's T२० Challenge : सुपरनोव्हाज आणि ट्रेलब्लेझर्स यांच्यात जेतेपदासाठी झुंज