मुंबई- चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये या विषाणूचा फैलाव झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जगभरातील ६ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रत्येक देश आपआपल्या परीने या विषाणुशी झुंज देत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माने एक व्हिडिओ संदेश जारी करत साऱ्यांना खास संदेश दिला आहे.
रोहितने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्याने स्वतःसह इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सद्याचे दिवस आपण सर्वांसाठी अत्यंत आव्हानात्मक आहेत. यावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आजुबाजूला काय चालले आहे, यावर आपले बारीक लक्ष असले पाहिजे. जर कोणाला या रोगाची लक्षणे दिसल्यास, त्याने त्वरीत जवळच्या रुग्णालयाला कळवले पाहिजे, असा संदेश रोहितने व्हिडिओच्या माध्यमातून दिला.