लंडन- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणाऱ्या रोहित शर्माने शतकांचाही धडाका लावला आहे. रोहित शर्माने बांगलादेश विरुध्दच्या सामन्यात खेळताना ९२ चेंडूत ५ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. रोहित शर्माचे हे स्पर्धेतील चौथे शतक आहे.
रोहित शर्माने या अगोदर पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि आज बांगलादेश विरुध्द शतक झळकावले. आजच्या बांगलादेश विरुध्दच्या सामन्यात रोहित शर्माने आक्रमक खेळ करत शतकी खेळी केली. या खेळीत त्याने ५ नेत्रदीपक षटकार लगावले, तर ७ चौकाराचीही बरसात केली.
यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत रोहित शर्मा खोऱ्याने धावा जमवत आहे. बांगलादेश विरुध्दच्या शतकी खेळीनंतर रोहितच्या नावावर या विश्वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक 544 धावा झाल्या आहेत. हा अव्वल क्रमांक पटकावताना रोहितने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला पिछाडीवर टाकले.
रोहित शर्माने आज चौथे शतक ठोकत श्रीलंकेच्या कुमार संगकारा याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. संगकाराने २०१५ च्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळताना ७ सामन्यात ४ शतकासह ५४१ धाव्या केल्या होत्या. यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत रोहित शर्माने आतापर्यंत ७ सामन्यात खेळताना ४ शतकांसह ५४४ धावा केल्या आहेत. त्याखालोखाल ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वार्नरने ८ सामन्यात २ शतकासह ५१६ धावा केल्या आहेत.
दरम्यान, विश्वकरंडक स्पर्धेमध्ये सर्वाधिक शतक ठोकण्याचा मान भारताच्या सचिन तेंडुलकरचा आहे. तेंडुलकरने ६ शतके ठोकली होती.