नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा फुटबॉलचा चाहता आहे. क्रिकेटव्यतिरिक्त तो अनेक फुटबॉल संघांनाही 'फॉलो' करतो. काही दिवसांपूर्वी, स्पेनची अव्वल लीग असलेल्या ला-लीगा स्पर्धेचा रोहित ब्रँड अम्बेसिडर झाला आहे. आता या स्पर्धेमधील आघाडीचा संघ असलेल्या रियल माद्रिद संघाने त्याला खास 'गिफ्ट' दिले आहे.
हेही वाचा -गरुडझेप..! १६ वर्षाच्या शफालीने टी-२० च्या क्रमवारीत मिळवले पहिले स्थान
माद्रिदने रोहितला त्याच्या नावाची जर्सी भेट म्हणून दिली आहे. रियल माद्रिद संघाचे संचालक एमिलियो बटरगिनो सँटोस यांनी ही जर्सी रोहितला दिली. त्यानंतर, 'या गिफ्टसाठी तुमचे खूप खूप आभार', अशी इंन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत रोहितने आभार मानले आहेत. त्याने रियल माद्रिदलाही आपल्या पोस्टमध्ये टॅग केले.
रियल माद्रिद आणि बार्सिलोना झालेल्या सामन्याला रोहितने पत्नी रितिकासमवेत हजेरी लावली होती. दोघांनीही या सामन्याचा मनसोक्त आनंद लुटला आणि सामन्यानंतर ते मैदानातही उतरले होते. रोहित रियल माद्रिदच्या ड्रेसिंग रूममध्येही गेला होता.
रोहितने नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत शानदार प्रदर्शन केले होते. रोहित सध्या दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. टी-२० मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती.