आबुधाबी- राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यातील सामन्यात आरसीबीने सहज बाजी मारली. कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७२ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. महिपाल लोमरोरच्या चिवट खेळीमुळे राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना १५४ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूच्या संघाने ८ गडी आणि ५ चेंडू राखत विजय साकारला. विराट व्यतिरिक्त देवदत्त पडीक्कलनेही ६३ धावांची खेळी केली. गोलंदाजीत युजवेंद्र चहलने ३ विकेट घेतले. यामुळे त्याला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
राजस्थानच्या १५४ धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची सुरूवात खराब झाली. अॅरोन फिंच ८ धावांवर बाद झाला. त्याला श्रेयस गोपालने पायचित केले. यानंतर देवदत्त पडीक्कल आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या गड्यासाठी ९९ धावांची भागिदारी केली. यादरम्यान, देवदत्तने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला जोफ्रा आर्चरने बाद केले. देवदत्तने ४५ चेंडूत ६ चौकार १ षटकारासह ६३ धावा केल्या. यानंतर विराटने मोर्चा सांभाळत संघाला विजय मिळवून दिला. विराटने ५३ चेंडूत ७ चौकार २ षटकारांसह नाबाद ७२ धावांची खेळी साकारली. एबी डिव्हिलिअर्सने नाबाद १२ धावा केल्या.
तत्पूर्वी, राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सावध सुरुवात केली. स्मिथ-बटलर या दोघांनी २ षटकात बिनबाद १६ धावा केल्या. तिसऱ्या षटकात इसुरू उडानाच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात स्मिथच्या बॅटची कड घेतलेला चेंडू यष्ट्यांवर आदळला. स्मिथ ५ धावा करू शकला. यानंतर नवदीप सैनीने आक्रमक फलंदाजी करत असलेल्या जोस बटलरला माघारी धाडले. बटलरने १२ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह २२ धावा केल्या. सैनीने त्याला पडीक्कलकडे झेल देण्यास भाग पाडले.
विराट कोहलीने पाचवे षटक युझवेंद्र चहलकडे सोपवले. तेव्हा या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चहलने संजू सॅमसनला (४) बाद केले. यानंतर रॉबिन उथप्पा आणि महिपाल लोमरोर यांनी ३९ धावांची भागिदारी केली. उथप्पाचा अडथळा चहलने दूर केला. उथप्पाने १७ धावा केल्या. यानंतर महिपाल आणि रियान पराग यांनी संघाचे शतक धावफलकावर लावले.
उडानाच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात रियान पराग (१६) बाद झाला. त्याचा झेल फिंचने टिपला. पराग पाठोपाठ महिपाल लोमरोरही बाद झाला. त्याने ३९ चेंडूत ४७ धावा केल्या. चहलने त्याला पडीक्कलकडे झेल देण्यास भाग पाडले. तेवतिया (१२ चेंडूत २४) आणि जोफ्रा आर्चर (१० चेंडूत) या जोडीने नाबाद ४० धावा करत राजस्थानला १५४ धावांची मजल मारून दिली. आरसीबीकडून चहलने तीन गडी टिपले. तर उडानाने २, सैनीने एक गडी बाद केला.