नवी दिल्ली- भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली आहे. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने रवी शास्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. कपिल देव यांच्या समितीने प्रशिक्षक पदासाठी सहा जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या. यात रवी शास्त्री यांची पुन्हा एकदा निवड होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर प्रशिक्षकपदाची धुरा शास्त्री यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली होती. उपांत्य सामन्यात भारतीय फलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीचा फटका संघाला बसला होता. त्यानंतर भारतीय संघाचे व्यवस्थापन आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. त्यामुळे बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक पदासाठी नव्याने अर्ज मागविले होते.
आजच्या निवडीमध्ये सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे पारडे जड मानले जात होते. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकडे तब्बल २००० अर्ज आले होते. त्यामधील फक्त ६ नावे निश्चित केली होती.या उमेदवारांमध्ये न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी, अफगाणिस्तानचे प्रशिक्षक फिल सिमॉन्स, भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत आणि भारताचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रॉबिन सिंग या पाच जणांचा समावेश होता.
शास्त्रींची प्रशिक्षक म्हणून कामगिरी -
जुलै २०१७ पासून शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय संघाने २१ सामन्यांपैकी १३ कसोटी सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयाची सरासरी ५२.३ इतकी राहिली आहे. टी-२० सामन्यात त्यांची ही सरासरी ६९.४४ अशी राहिली आहे. टी-२० मध्ये भारताने ३६ पैकी २५ सामन्यांत विजय मिळवला आहे. एकदिवसीय सामन्यांचे सांगायचे झाले तर,शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली, भारताने ६० पैकी ४३ सामने जिंकले आहेत. एकदिवसीय सामन्यात शास्त्रींची सरासरी ७१.६७ इतकी आहे.