सिडनी - भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये ६ हजार धावांचा टप्पा पार केला. पुजारा अशी कामगिरी करणारा भारताचा ११ वा खेळाडू ठरला आहे. त्याने सिडनीमध्ये नॅथन लिओनच्या चेंडूवर धाव घेत ६ हजाराचा टप्पा गाठला. याशिवाय पुजारा सर्वाधिक वेगाने ६ हजार धावा करणारा भारताचा ६ वा फलंदाज ठरला आहे.
कसोटी स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या पुजाराने ८० कसोटीतील १३४ डावात ६ हजार धावा पूर्ण केल्या. यात १८ शतकं आणि २७ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांची सरासरी ४८ इतकी आहे. तर त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद २०६ आहे.
पुजाराआधी भारताकडून ६ हजार धावांचा टप्पा सचिन तेंडुलकर (१५९२१), राहुल द्रविड (१३२६५), सुनिल गावसकर (१०१२२), व्हीव्हीएस लक्ष्मण (८७८१), विरेंद्र सेहवाग (८५०३), विराट कोहली (७३१३), सौरव गांगुली (७२१२), दिलीप वेंगसरकर (६८६८), मोहम्मद अजहरुद्दीन (६२१५) आणि गुंडप्पा विश्वनाथ (६०८०) यांनी पार केला आहे. ३२ वर्षीय पुजारा भारताकडून सर्वात वेगाने ६ हजार धावांचा टप्पा करणारा ६ वा खेळाडू ठरला आहे.