नवी दिल्ली -भारताचा डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये बिहारकडून ओझाने शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळला होता. प्रथम श्रेणीमध्ये हैदराबाद आणि बंगाल संघांकडून ओझाने आपली कामगिरी दर्शवली आहे.
हेही वाचा -रहाणे म्हणतो, 'या'कारणाने न्यूझीलंड प्रबळ दावेदार
ओझाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर दोन पानांचे पत्र लिहून आपल्या निवृत्तीची माहिती दिली. यात त्याने आपल्या संघाचे माजी कर्णधार आणि सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. 'जीवनाच्या पुढच्या टप्प्यावर जाण्याची वेळ आली आहे', असे या पत्राच्या कॅप्शनमध्ये ओझाने लिहिले आहे. २००८ मध्ये भारताच्या एकदिवसीय संघात ओझाने पदार्पण केले होते. २०१३ मध्ये त्याने भारतासाठी अखेरचा सामना खेळला होता.
प्रग्यान ओझाने भारताकडून २४ कसोटी, १८ एकदिवसीय आणि ६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये हातखंडा असणाऱ्या ओझाने ११३ बळी मिळवले आहेत. ४७ धावांमध्ये ६ बळी ही ओझाची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.