नवी दिल्ली -भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराजने रोहित शर्मासमवेत इन्स्टाग्रामवर बोलताना युजवेंद्र चहलबाबत एक जातीवाचक टिप्पणी केली. त्यानंतर, नेटकऱ्यांनी युवराजकडून माफीची मागणी केली.
युवराजविरोधात हरियाणा येथील वकील रजत कलसन यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर युवराजवर गुन्हा दाखल करण्यात आला. रजत यांनी युवराजशिवाय, रोहित शर्मावरही आरोप केला आहे. युवराज या शब्दाचा वापर करताना रोहित हसत होता, असे रजत यांनी सांगितले. पोलीस याप्रकरणी चौकशी करणार असून दोषी आढळल्यास युवराज आणि रोहितला अटक होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाविषयी युवराज सिंगने ट्विटरच्या माध्यमातून माफी मागितली आहे. युवराज म्हणाला, ''मी कोणत्याही प्रकारच्या भेदभावावर विश्वास ठेवत नाही. लोकांच्या कल्याणात मी माझे जीवन जगतो. मी माझ्या मित्रांशी बोलत होतो, तेव्हा माझ्या वाक्याचा विपर्यास करण्यात आला. एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांची जाहीररित्या माफी मागतो. देश आणि देशातील लोकांवर माझे नेहमीच प्रेम असेल.''
वाचा नक्की प्रकरण काय -
सध्या कोरोना विषाणूमुळे क्रिकेट उपक्रम बंद असून अनेकजण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. युवराज आणि रोहितच्या संभाषणादरम्यान युवराज म्हणाला, "या xxx लोकांचे काहीही काम नाही. युझीचा व्हिडिओ पाहिला का?" यावर रोहितने उत्तर दिले, "मी त्याला (युजवेंद्र चहल) सांगितले की तू बापाला नाचवतोस. तू वेडा तर नाहीस?''त्यानंतर, या दोघांचा हा संवाद सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला. युवराजने माफी मागावी, असा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंड झाला होता.