पेशावर- कोरोनाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला असून जवळपास सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान क्रीडा क्षेत्रातून एक वाईट बातमी आली आहे. पाकिस्तानचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू जफर सर्फराज यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ५० वर्षीय जफर पेशावर येथील खाजगी रुग्णालयात, मागील तीन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते.
जफर कोरोनाशी झुंज देताना मृत्यू पावलेले पहिले व्यावसायिक क्रिकेटपटू ठरले. पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अख्तर सर्फराज यांचे जफर हे भाऊ होते. अख्तर सर्फराज यांचे १० महिन्यापूर्वी कर्करोगामुळे निधन झाले आहे.
जफर यांनी १९८८ मध्ये क्रिकेट करिअरला सुरुवात केली. त्यांनी पेशावरसाठी १५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६१६ धावा केल्या आहेत. शिवाय त्यांनी सहा एकदिवसीय सामन्यांत खेळताना ९६ धावा केल्या. १९९४ मध्ये त्यांनी निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर त्यांनी पेशावरच्या १९ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली. २००० साली त्यांनी सिनिअर संघासाठी सेवा पुरवली.