कराची -पाकिस्तानच्या कसोटी सामन्यांच्या इतिहासात आजवर ४३२ सामन्यांची नोंद आहे. त्यापैकी, १९९९ मध्ये खेळल्या गेलेल्या भारताविरुद्धच्या कसोटीला पाक चाहत्यांनी सर्वोच्च सामन्याचा दर्जा दिला आहे. चेन्नईत खेळल्या गेलेल्या या कसोटीमध्ये पाकिस्तान संघाने १२ धावांनी विजय मिळवला होता.
पाकिस्तानच्या एका वृत्तपत्रानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चाहत्यांसाठी एक मतदान घेतले होते. त्यामध्ये १९५४, १९८७, १९९४ आणि १९९९ मध्ये झालेल्या कसोटी सामन्यांचे पर्याय देण्यात आले होते. त्यापैकी ६५ टक्के लोकांनी १९९९ मध्ये खेळल्या गेलेल्या भारताविरुद्धच्या कसोटीला निवडले आहे. २६ ते २९ जुलैपर्यंतच्या दरम्यान फेसबुक आणि ट्विटरवर हे मतदान घेण्यात आले होते. या मतदानात, एकूण १५,८४७ लोकांनी भाग घेतला होता.
२८ ते ३१ जानेवारी १९९९ मध्ये ही कसोटी खेळवण्यात आली होती. वेगवान गोलंदाज वसिम अक्रम तेव्हा पाकिस्तानचा कर्णधार होता. या कसोटीविषयी त्याला विचारले असता तो म्हणाला, 'ज्या लोकांनी त्या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहिले असेल आणि आजही त्यांच्या पोटात गोळा येत असेल तर विचार करा प्रत्यक्ष मैदानावर असलेल्यांची काय अवस्था झाली असेल. आपण जर दबावाची गोष्ट करत असू तर चेन्नईची ती कसोटी एक महत्त्वाची आठवण आहे.'
या सामन्यात एकूण १५२ धावा आणि तीन विकेट घेणाऱ्या शाहिद आफ्रिदीने या कसोटीबद्दल मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला, 'मला त्या संघाचा भाग होता आल्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजतो'. या सामन्याच्या दुसऱ्या डावात १३६ धावांची जबरदस्त खेळी करणाऱ्या सचिन तेंडुलकरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.