मुंबई- भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि भाजपचा विद्यमान खासदार गौतम गंभीरने, पाकिस्तानच्या एका रुग्णालयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात डॉक्टर्स कोरोना रुग्णांसमोर चक्क डान्स करत आहेत.
गंभीरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, पीपीई किट घातलेले डॉक्टर्स कोरोना रुग्णांसमोर चक्क डान्स करून रुग्णांचा मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत. गंभीरने हा व्हिडीओ शेअर करताना लिहीले की, 'कोरोना जिथे कुठे आहेस ऐक... चिट्टा चोला...' त्यानंतर त्याने पुढे 'नया पाकिस्तान' हे हॅशटॅग वापरले आहे. दरम्यान, हा व्हिडिओ पाकिस्तानमधील आहे की नाही, याची अधिकृतरित्या पृष्टी झालेली नाही.
कोरोनामुळे संपूर्ण जगामध्ये भितीचे वातावरण आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांसह मृतांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. सद्य घडीला जगभरात कोरोना रुग्णांची संख्या १८ लाखाहून अधिक झाली आहे. तर मृताचा आकडा १ लाख १४ हजारावर पोहोचला आहे. तर ४ लाख २३,७०८ जणं कोरोनामुक्त झाली आहेत.