कराची- श्रीलंका विरुध्दच्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा युवा गोलंदाज मोहम्मद हसनैनने इतिहास रचला आहे. त्याने या सामन्यात हॅट्रीक घेतली असून असा कारनामा करणारा तो जगातील सर्वात युवा गोलंदाज ठरला आहे.
१९ वर्षीय मोहम्मद हसनैनने श्रीलंका विरुध्दच्या पहिल्या टी-२० सामन्यात असा कारनामा केला. हसनैनने १६ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर लंकेचा फलंदाज भनुका राजपक्षा याला बाद केले. त्यानंतर त्याने १९ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर दसुन शनाका आणि दुसऱ्या चेंडूवर शेहान जयसुर्या यांना बाद करत हॅट्ट्रीक साधली.
यापूर्वी असा कारनामा पाकच्याच फहिम असरफ याने केला होता. फहिमने २०१७ साली श्रीलंकेविरुध्द हॅट्ट्रीक घेतली होती. त्याचा हा विक्रम हसनैन याने मोडला. महत्वाचे म्हणजे, हसनैन याचा जन्म हैदराबाद येथे झाला आहे. दरम्यान, सर्वात कमी वयात हॅट्रीक विकेट घेण्याची किमया पाकच्या अकिब जावेद यांनी केली आहे.