मुंबई - क्रिकेट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक 'छोटेखानी' व्यक्ती चटकन डोळ्यासमोर उभी राहते ती म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. सचिनने क्रिकेटला अलविदा केला असला तरी त्याचे अनेक विक्रम आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. या विक्रमांपैकीच एक महत्वाचा विक्रम सचिनने १९ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी रचला होता. त्याच्या या विक्रमाचे संपूर्ण जगभरातून कौतुक झाले होते.
हेही वाचा -'एकेरीमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी चिंताजनक', गोपीचंद यांचा ईटीव्ही भारतकडे खुलासा
१० डिसेंबर २००५ रोजी 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरने 'लिटल मास्टर' म्हणून ओळखले जाणारे भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांना मागे टाकले. सचिनने या दिवशी कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात गावस्कर यांना पछाडले. श्रीलंकेविरूद्ध दिल्ली येथे झालेल्या कसोटीत त्याने हा कारनामा केला होता. या सामन्यातील पहिल्याच डावात सचिनने कसोटीचे ३५ वे शतक झळकावत मैदानात उपस्थित असलेल्या चाहत्यांचा आनंद द्विगुणित केला.
सचिनने या डावात १४ चौकार आणि एका षटकारासह १०९ धावांची खेळी केली होती. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने लंकेला १८८ धावांनी पराभूत केले होते. कसोटीतील या महत्वाच्या विक्रमात १९८९ साली क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला सचिन आजही प्रथम स्थानी विराजमान आहे.
क्रिकेटच्या सर्व प्रकारांत मिळून सचिनच्या खात्यात ३४,३५७ धावा जमा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८,४२६ तर, कसोटीत त्याने १५,९२१ धावा चोपल्या आहेत. सध्या सचिन आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहे.