मुंबई -क्रिकेटविश्वात अनेक सामने होतात, जे आपल्या 'मेमरी'त कायमचे छापले जातात. या सामन्यांमधील धडकी भरवणाऱ्या प्रसंगाचे आपण साक्षीदार असतो. असाच एक सामना १० मार्च १९८५ रोजी खेळला गेला. या सामन्याला आज ३६ वर्षे पूर्ण झाली.
१९८५मध्ये बेंसन आणि हेजेस टुर्नामेंट पार पडली. यात भारताने विजेतेपद मिळवले. ३६ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला मात देत ही स्पर्धा जिंकली होती. सुनील गावसकरांच्या नेतृत्वातील टीम इंडियाने पाकिस्तानचा ८ गडी राखून फडशा पाडला होता.
नाणेफेक जिंकलेल्या पाकिस्तानने प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. मात्र, त्यांचा हा निर्णय पूर्णत: अंगउलट आला. निर्धारित ५० षटकांमध्ये पाकिस्तानचा संघ ९ गडी गमावून १७६ धावाच करू शकला. भारताच्या जलदगती गोलंदाजांसमोर पाक खेळाडू टिकू शकले नाहीत. संघासाठी दिग्गज फलंदाज जावेद मियांदादने सर्वाधिक ४८ धावा जमवल्या होत्या. त्याच्याशिवाय, अष्टपैलू खेळाडू इम्रान खानने ३५ धावांचे योगदान दिले होते. तर, भारताकडून कपिल देव, लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी प्रत्येकी ३ तर, चेतन शर्मा आणि रवी शास्त्री प्रत्येकी १ बळी मिळवण्यात यशस्वी झाले.