कराची - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने दानिश कनेरिया या हिंदू क्रिकेटपटूसोबत पाकचे खेळाडू भेदभाव करत होते, असा गौप्यस्फोट केल्यानंतर क्रिकेटजगतातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर कनेरियाने या वक्तव्याला खरे सांगत या प्रकरणी वाचा फोडली. आता कनेरियाने पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका केली आहे.
दानिश कनेरियाचे नवे ट्विट हेही वाचा -डोपिंगप्रकरणी भारतीय वेटलिफ्टर सीमावर ४ वर्षांची बंदी
स्पॉट फिक्सिंगमुळे आजीवन बंदीचा सामना करत असलेला लेगस्पिनर कनेरियाने शनिवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि सरकारवर नवीन आरोप केले. बंदी लागू झाल्यानंतर सरकार आणि पीसीबीने त्याला मदत केली नसल्याचे कनेरियाने म्हटले आहे. 'हे खरे आहे की माझ्या कबुलीनंतर मला पाकिस्तान सरकार किंवा बोर्डाकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही, तर माझ्यासारखेच अन्य खेळाडू पीसीबीच्या पाठिंब्याने पाकिस्तानकडून खेळत आहे. आणि त्यांचा आदर देखील केला जात आहे', असे कनेरियाने ट्विटमध्ये म्हटले आहे.
'पाकिस्तानच्या लोकांनी मात्र माझ्यावर कधीही धर्माच्या आधारे भेदभाव केला नाही. मला अभिमान आहे की मी पाकिस्तानसाठी संपूर्ण प्रामाणिकपणे खेळू शकलो. आता हे माझ्या देशाचे सरकार आहे, इम्रान खान, पीसीबी ते त्यांच्या हातात माझे भविष्य आहे', असे कनेरियाने पुढे म्हटले आहे.
दानिश कनेरिया पाकिस्तानच्या संघाकडून खेळणारा दुसरा हिंदू खेळाडू असून त्याचे मामा अनिल दलपत हेही पाकिस्तानच्या संघात खेळले होते. दानिश कनेरियाने ६१ कसोटी आणि १८ एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने कसोटीत २६१ तर एकदिवसीय सामन्यांत १५ बळी घेतले.