माउंट माउनगुई - न्यूझीलंड संघाने वर्षाचा शेवट विजयाने केला. पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना यजमान संघाने १०१ धावांनी जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पाचव्या दिवशी पाकिस्तानचा संघ ३७२ धावांचा पाठलाग करताना २७१ धावांवर ऑलआऊट झाला.
पाचव्या दिवशी पाकिस्तानने ३ बाद ७१ धावांवरुन खेळण्यास सुरूवात केली. फवाद आलमने तब्बल ११ वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले. त्याचा अडथळा नील वॅग्नर याने दूर केला. फवादने २६९ चेंडूत १०२ धावांची खेळी केली. फवाद बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या संघाला २७१ धावांपर्यंत मजल मारता आली.
न्यूझीलंडकडून पहिल्या डावात कर्णधार केन विल्यमसनने १२९ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने ४३१ धावा धावफलकावर लावल्या. यात रॉस टेलर, हेन्री निकोलस आणि वीजे वॉटलिंग यांच्या अर्धशतकांचा देखील समावेश आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने पहिल्या डावात ४ गडी बाद केले. यानंतर पाकिस्तानचा पहिला डाव २३९ धावांत आटोपला. तेव्हा न्यूझीलंडला पहिल्या डावात १९२ धावांची आघाडी मिळाली. न्यूझीलंडने आपला दुसरा डाव ५ बाद १८० धावांवर घोषित करत पाकिस्तानसमोर विजयासाठी ३७२ धावांचे आव्हान ठेवले होते.