वेलिंग्टन- भारतविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरूवात होण्याआधीच न्यूझीलंडच्या एका खेळाडूने पहिल्या सामन्यातून माघार घेतली आहे. टी-२० त भारताने तर एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने निर्भेळ यश मिळवले. यामुळे कसोटी मालिकेला वर्चस्वाची लढाई म्हणून पाहिले जात आहे. तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी ही मालिका महत्वाची ठरणार आहे. दरम्यान मालिकेच्या पहिल्या सामन्यातून न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅग्नरने माघार घेतली असून त्याच्या ऐवजी मॅट हेन्रीचा समावेश संघात करण्यात आला आहे.
नील वॅग्नर लवकरच बाप बनणार आहे. यामुळे त्याने पहिल्या कसोटीतून माघार घेत पत्नीसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला. वॅग्नर पहिल्या कसोटीसाठी हॅमिल्टन येथे पोहोचला नाही. यामुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्याला 'डच्चू' दिलं आहे. दुसरीकडे मॅट हेन्रीने ऑस्ट्रेलियाविरुद्धची अखेरची कसोटी सामना खेळल्यानंतर संघात परतला आहे. त्याला त्या कसोटीत दुखापत झाली होती. या कारणाने तो भारताविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध नव्हता.
उभय संघात पहिला कसोटी सामना २१ ते २५ फेब्रुवारी या काळात वेलिंग्टन येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च दरम्यान ख्राइस्टचर्च येथे होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ४ वाजता सुरु होणार आहेत.