वेलिंग्टन- टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेनंतर न्यूझीलंड दौऱयावर ५ टी-२०, ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळण्यासाठी जाणार आहे. या दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आज एकदिवसीय आणि कसोटी सामन्याची घोषणा करण्यात येणार आहे. यात मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याची निवड एकदिवसीय संघात केली जाण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, शॉ न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय अ संघाचा सदस्य असून त्याने प्रमुख संघाच्या निवडआधीच ताबडतोड फलंदाजी करत आपली दावेदारी मजबूत केली आहे.
रणजी करंडक स्पर्धेत झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर पृथ्वी शॉने दमदार पुनरागमन केले. त्याने न्यूझीलंड इलेव्हन विरुद्ध खेळताना १०० चेंडूत २२ चौकार आणि २ षटकारासह १५० धावा झोडपल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय अ संघाने ३७२ धावा केल्या.
डोपिंग चाचणीत आठ महिन्यांची बंदीची शिक्षा भोगल्यानंतर, पृथ्वीने रणजी करंडक स्पर्धेतून पुनरागमन केले. या स्पर्धेदरम्यान, मुंबई संघाकडून खेळताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली. यामुळे त्याचा न्यूझीलंड दौरा अनिश्चित मानला जात होता. मात्र, तो दुखापतीतून सावरला असून त्याने आपली उपयुक्तता न्यूझीलंड इलेव्हनविरुद्ध खेळताना दाखवून दिली. त्याने या सामन्यात १०० चेंडूत १५० धावा चोपल्या.