चेन्नई - अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवला. विराट या दौऱ्यातील पहिल्या सामन्यानंतर पॅटर्निटी लिव्हवर मायदेशी परतला होता. यामुळे अजिंक्यकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. आता भारतीय संघ विराटच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्ध दोन हात करणार आहे. उभय संघातील या मालिकेला सुरूवात होण्याआधी अजिंक्यने विराटला मदत करण्याचा निश्चिय बोलून दाखवला.
भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी आज (बुधवार) झालेल्या व्हर्चुअल पत्रकार परिषदेत बोलताना अजिंक्य म्हणाला की, 'माझे काम विराटच्या पाठीमागे राहून मदत करण्याचे आहे. हे काम सोप्प आहे. जेव्हा विराटला काही मदतीची गरज असेल तर मी ती करेन. विराट कर्णधार होता आणि तो घरगुती कारणामुळे ऑस्ट्रेलिया दौरा सोडून मायदेशी परतला. यामुळे माझ्याकडे कर्णधारपद आले.'
ऑस्ट्रेलियातील विजय हा भूतकाळ आहे. आता आपण वर्तमानात आहोत. आम्ही इंग्लंड संघाचा सन्मान करतो, कारण त्यांनी श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकली आहे. आमचे सगळे लक्ष फक्त चांगले क्रिकेट खेळण्यावर आहे. आम्ही इंग्लंडला हलक्यात घेणार नाही, असे देखील अजिंक्यने सांगितले.