नवी दिल्ली -आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आयपीएलच्या तेराव्या सत्रापूर्वी धोनी आता आठवडाभराच्या शिबिरासाठी शुक्रवारी चेन्नईला रवाना होईल.
कोरोनामुळे यंदाच्या आयपीएलचे आयोजन १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) होणार आहे. चेन्नईतील शिबिरापूर्वी, धोनीने त्याचा सहकारी मोनू कुमार सिंग याच्यासोबत ही चाचणी केली आहे.
धोनी गेल्या वर्षभरापासून क्रिकेट खेळलेला नाही. तो या आयपीएलद्वारे क्रिकेटच्या मैदानावर एका वर्षानंतर पाऊल ठेवणार आहे. आयपीएलमध्ये धोनी कशी कामगिरी करतो यावरच त्याचे भारतीय संघातील भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे ही स्पर्धा धोनीसाठी खूप महत्वाची मानली जात आहे.
बीसीसीआयने बनवलेल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग मानकांनुसार, (एसओपी)चेन्नईला पोहोचल्यानंतर खेळाडूंची पुन्हा एकदा चाचणी केली जाईल. बीसीसीआयने २० ऑगस्टनंतरच संघांना युएईला जाण्यास सांगितले आहे. बीसीसीआयच्या एसओपीनुसार, खेळाडू आणि संघ मालकांची कुटुंबे आयपीएल दरम्यान जैव-सुरक्षित वातावरणात राहतील. तत्पूर्वी राजस्थान रॉयल्सचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याग्निक कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळला आहे.