मुंबई- भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा त्याच्या शांत स्वभाव आणि हटके रणनितीमुळे ओळखला जातो. परिस्थिती कितीही खडतर असली तरी धोनी कधीच रागावलेला, वैतागलेला पाहायला मिळायचा नाही. या कारणानेच त्याला क्रिकेटविश्वात कॅप्टन कूल या नावानेही ओळखले जाते. पण सध्याच्या घडीला धोनी आपल्या मित्रांवर चांगलाच भडकत असल्याचे पाहायला मिळत आहे.
धोनी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या २०१९ विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर संघाबाहेर आहे. अशात त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना ऊत आला आहे. धोनीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेले नाही. पण, धोनीच्या जवळच्या मित्राने, एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, 'माहीला निवृत्तीबद्दल विचारले की राग येतो, त्याच्यामते तो अजुनही सर्वात तंदुरुस्त यष्टीरक्षक आहे.'
धोनीचा मित्राने सांगितलं की, 'मागील काही महिन्यांमध्ये धोनी स्वतःच्या तंदुरुस्तीवर अधिक भर देत आहे. मी त्याला याआधी इतका सराव करताना कधीच पाहिलेले नाही. वय हे त्याच्या हातात राहिलेले नाही हे त्याला माहिती आहे. त्यामुळे अधिकाधिक सराव हाच त्याला संघात कायम राखू शकतो, ही बाब तो जाणून आहे.'