दुबई - यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित झाले होते. तब्बल एका वर्षानंतर परत आलेला धोनी आपल्या लयीत नव्हता. मात्र, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात धोनीने रंगतदार खेळी केली. धोनीने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत स्फोटक खेळ केला.
माही मार रहा है!...धोनीच्या बॅटमधून १०२ मीटर लांबीचा षटकार
आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात धोनीने रंगतदार खेळी केली. यात धोनीच्या बॅटमधून निघालेला षटकार १०२ मीटर लांब गेला.
धोनीने १३ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह २१ धावा केल्या. या सामन्यात त्याचा स्ट्राइक रेट १६१.५४ इतका होता. धोनीच्या बॅटमधून निघालेला षटकार १०२ मीटर लांब गेला. या उत्तुंग षटकारामुळे धोनीप्रेमी खूष झाले आहेत. हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी. नटराजनच्या चेंडूवर धोनीने ऑफ साइडच्या दिशेने हा मोठा षटकार ठोकला.
आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईने हैदराबादला २० धावांनी नमवले. चेन्नईच्या १६८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला २० षटकांत ८ बाद १४७ धावांपर्यंतच मजल मारता आली.