मुंबई- भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार, जागतिक क्रिकेटमध्ये टी-२०, आयसीसी विश्वकरंडक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा एकमेव कर्णधार अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीसाठी ५ एप्रिल हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. धोनीने आजच्या दिवशी २००५ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पहिले शतक झळकावले होते.
धोनीने विशाखापट्टणमच्या मैदानात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पहिल्या शतकाची नोंद केली होती. धोनीने १२३ चेंडूत १५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १४८ धावांची खेळी केली होती. त्यांच्या या खेळीमुळे भारताने पाकिस्तानसमोर निर्धारीत ५० षटकात ९ बाद ३५६ धावांचा डोंगर उभारला होता. धोनीला या सामन्यात विरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांनी मोलाची साथ दिली. भारताने हा सामना पाकिस्तानला २९८ धावांमध्ये रोखत आरामात जिंकला. आशिष नेहराने या सामन्यात ४ गडी बाद केले होते.
दरम्यान, धोनी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या २०१९ विश्वकरंडक स्पर्धेतील भारतीय संघाच्या पराभवानंतर संघाबाहेर आहे. या सामन्यानंतर धोनीने आजघडीपर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अनेकदा धोनीच्या निवृत्तीबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत असते, मात्र धोनीने अद्याप अधिकृतपणे कोणतीही गोष्ट जाहीर केली नाही.