नवी दिल्ली -भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. धोनीचा एक नवा फोटो सध्या खूप ट्रेंड होत असून त्याचा हा लूक पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. धोनीची मुलगी झिवाच्या इन्स्टाग्राम हँडलवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये धोनी नव्या अवतारात दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये पांढऱ्या दाढीसह दिसणाऱ्या धोनीला पाहून सोशल मीडियावर बरेच मीम्स आणि पोस्ट्स केल्या जात आहेत. ''सर्वांचा आवडता खेळाडू म्हातारा झाला आहे'', असेही काही नेटिझन्स म्हणाले आहेत.
धोनीच्या या फोटोवर क्रिकेट विश्लेषक अयाज मेमन यांनीही ट्विट केले आहे. "कोणीतरी मला हा फोटो पाठवला आहे. तो खरोखर धोनी आहे की कोणी फोटोशॉप केले आहे?", असे मेमन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
धोनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवू इच्छित आहे. पण आयपीएलवर सद्या कोरोनाचे सावट आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल विसरा, असे सूचक संकेत दिले आहे. जर आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास धोनीचे भवितव्य अंधारात आहे. आजही धोनीच्या निवृत्तीविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत. पण धोनीने अद्यापही याविषयी कोणतेही संकेत दिलेले नाही.