मुंबई- महेंद्रसिंह धोनी आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन हे विराट कोहलीला संघात घेण्यास इच्छुक नव्हते, असा गौप्यस्फोट भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि निवड समिती माजी सदस्य दिलीप वेंगसरकर यांनी केला आहे. त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना हा गौप्यस्फोट केला आहे. यासोबत त्यांनी या कारणामुळेच आपल्याला नोकरी गमवावी लागल्याचाही दावा केला आहे.
दिलीप वेंगसरकर यांनी सांगितलं की, '२००८ मध्ये ऑस्ट्रेलियात युवा खेळाडूंसाठी इमर्जिंग प्लेअर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चार मुख्य संघाच्या 'ए' टीमचा सहभाग होता. ते संघ होते भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड. निवड समितीने, या स्पर्धेसाठी २३ वर्षांखालील खेळाडूंचीही निवड करण्याचे ठरवले. त्यावेळी भारताच्या १९ वर्षांखालील संघाने, विश्वकरंडक जिंकला होता. विराट या अंडर- १९ संघाचा कर्णधार होता. तसेच त्याने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. यामुळे मी त्याची निवड इमर्जिंग प्लेअर्स स्पर्धेसाठी केली.'
विराटच्या फलंदाजीचे कौशल्य चांगले होते. यामुळे मी त्याला भारतीय संघात घेऊ इच्छित होतो. भारतीय संघ यादरम्यान, श्रीलंका दौऱ्यावर जाणार होता. या दौऱ्यासाठी वेंगसरकर यांनी विराटच्या नावाची शिफारीस केली. यावर निवड समिती प्रमुख तसेच सदस्यांनी सहमती दर्शवली. पण धोनी आणि कर्स्टन यांनी असहमती दर्शवली, असल्याचे वेंगसरकर यांनी सांगितलं.
धोनी आणि कर्स्टन यांनी, आम्ही विराटला खेळताना पाहिलेले नाही. यामुळे आम्ही आपला संघ कायम ठेऊ इच्छित आहे, असे सांगितले. यावर मी त्याना, तुम्ही जरी विराटला खेळताना पाहिलेले नसले तरी मी पाहिलं आहे. तो चांगला खेळाडू असून त्याला संघात खेळवलं पाहिजे, असे सांगितले. पण त्यांनी असहमती दर्शवली.