चेन्नई -आयपीएलच्या 12 व्या मोसमातील 'क्वालिफायर-1' सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नईवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळविला. या विजयासह मुंबईच्या संघाने आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. एम. ए. चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने मुंबईसमोर विजयासाठी 132 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाने 4 गडी गमावत 18.3 षटकांमध्ये विजय साजरा केला. मुंबईकडून ईशान किशनने 28 तर सूर्यकुमार यादवने शानदार 71 धावांची अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला.
IPL: चेन्नईचा धुव्वा उडवत मुंबईने गाठली अंतिम फेरी, सूर्यकुमारची अर्धशतकी खेळी
मुंबईच्या राहुल चहर आणि कृणाल पंड्याच्या फिरकीने चेन्नईला अवघ्या १३१ धावात रोखले
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. फाफ डय़ू प्लेसिस (6), शेन वॉटसन (10) सुरेश रैना (5) झटपट बाद झालेत. मात्र पाचव्या स्थानी फलंदाजीस आलेल्या अंबाती रायडू आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संघाचा डाव सावरत चेन्नईला 131 धावांपर्यंत मजल मारून दिली. चेन्नईसाठी रायडूने सर्वाधिक 42, मुरली विजयने 26 तर धोनीने 37 धावांची खेळी केली. मुंबईकडून राहुल चहरने 2 तर कृणाल पंडय़ा आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. आयपीएलच्या या मोसमात मुंबई आणि चेन्नई आतापर्यंत 3 वेळा आमने सामने आले असून तीन्ही सामन्यात मुंबईने धोनीच्या चेन्नईला पराभवाचे पाणी पाजले आहे.
दोन्ही संघानी आपापल्या संघात एक बदल केला होता. मुंबईने वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनेघनच्या जागी जयंत यादवला तर चेन्नईच्या संघाने दुखापतग्रस्त केदार जाधवच्या जागी मुरली विजयला संधी दिली होती.