चेन्नई - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बाराव्या मोसमातील २३ व्या सामन्यात आज चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स आमनेसामने येणार आहेत. हा सामना चेन्नईच्या घरच्या चेपॉक स्टेडियमवर रात्री ८ वाजता खेळण्यात येणार आहे. या सामन्यात विंडीजचे खेळाडू आंद्रे रसेल आणि सुनील नरिन यांच्यापासून चेन्नईच्या संघाला सावध राहावे लागणार आहे. कारण या दोन्ही खेळाडूंमध्ये कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटून टाकण्याची क्षमता आहे.
चेन्नईच्या संघात महेंद्रसिंह धोनी, शेन वॉटसन, फाफ डय़ू प्लेसिस, ड्वेन ब्राव्हो, इम्रान ताहीर, हरभजन सिंग आणि रवींद्र जडेजा यांसारख्या दिग्गजांचा भरणा आहे. तर दुसरीकडे कोलकातामध्ये दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनील नरिन, रॉबिन उथप्पा, ख्रिस लीन, कुलदीप यादव आणि नितीश राणा यांसारख्या चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाता पहिल्या तर चेन्नई दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे हा सामना जिंकून आपले अव्वल स्थान परत मिळवण्याच्या इराद्याने चेन्नचा मैदानात उतरेल. दोन्ही संघानी आतापर्यंत ५ सामने खेळले असून त्यातील ४ सामने जिंकण्यात यश आले. दोन्ही संघाच्या खात्यात प्रत्येकी ८ गुण जमा आहेत. मात्र, नेट रन रेटच्या आधारावार कोलकाताला पहिल्या तर चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे.