नवी दिल्ली- भारतीय क्रीडा इतिहासात पहिल्यादांच एका महिला अॅथलिटची 'पद्मविभूषण' पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. बॉक्सिंगमध्ये सहा वेळा विश्वविजेती ठरलेली बॉक्सर मेरी कोम हिचे नाव देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. या आधी मेरी कोमला २०१३ साली 'पद्मभूषण' तर २०१६ साली 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे इतर पद्म पुरस्कारांसाठीही क्रीडा मंत्रालयाने यंदा महिला खेळाडूंचे नावच पुढे केले आहे.
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या पी.व्ही.सिंधूला पद्मभूषण पुरस्कारासाठी नाव सुचवण्यात आले आहे. तर कुस्तीपटू विनेश फोगट, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आणि हॉकीपटू राणी रामपाल, नेमबाजपटू सुमा शिरुर, टेबल टेनिसस्टार मनिका बत्रा आणि ताशी-नुंगशी या जुळ्या बहिणींचे नाव पद्मश्री पुरस्कारासाठी सुचवण्यात आले आहे.