मेलबर्न - बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय गोलंदाजांनी नियोजनबद्ध गोलंदाजी करत यजमान ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या डावात १९५ धावांत रोखलं. यानंतर गोलंदाजांसह भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेचे कौतूक सद्या होत आहे. यादरम्यान, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबूशेन याने देखील भारतीय गोलंदाजांचे कौतूक केले.
मार्नस लाबूशेन म्हणाला की, 'पहिल्या डावात आम्ही भारतीय संघावर दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने मैदानात आलो होते. पण आमच्या संघातील तीन फलंदाज ज्या पद्धतीने बाद झाले, ते निराशजनक होते. आम्ही नक्कीच चांगले करू शकलो असतो. पण असे काही घडले नाही परिणामी आम्ही दबावात आलो.'
भारतीय गोलंदाजांनी योग्य लाइन, लेंथने गोलंदाजी केली. आम्हाला धावा करण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी योजना आखली होती. यात ते यशस्वी ठरले, असे देखील लाबूशेन म्हणाला. दरम्यान, पहिल्या डावात बुमराहने ५६ धावात ४ गडी बाद केले. तर अश्विनने ३५ धावात ३ गडी बाद केले. या दोघांच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. लाबूशेनने १३२ चेंडूचा सामना करत ४८ धावा केल्या.