दुबई - आयसीसीच्या एकदिवसीय जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला इंग्लंडचा संघ २०१९ विश्वचषक स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. विश्वचषक स्पर्धेला आता थोडाच अवधी बाकी राहिला आहे. त्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मार्कस ट्रेस्कोथिक यांनी विस्फोटक फलंदाज जोस बटलर हा इंग्लंडसाठी निर्णायक कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला.
विश्वचषक स्पर्धेत जोस बटलर इंग्लंडसाठी निर्णायक ठरेल - england
इंग्लंडचा संघ २०१९ विश्वचषक स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
आपल्या वादळी खेळीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या २८ वर्षीय जोस बटलरने आतापर्यंत इंग्लंडसाठी १२६ एकदिवसीय सामने खेळला असून त्यात त्याने १०५ डावात ७ शतक आणि १८ अर्धशतकांच्या जोरावर ३ हजार ३८७ धावा केल्या आहेत. बटलरने गेल्या काही वर्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून इंग्लंडचा अव्वल दर्जाचा फलंदाज म्हणून आपली क्रिकेट विश्वात ओळख बनवली आहे.
विश्वचषक २०१९ स्पर्धा घरच्या मैदानांवर होणार असल्याने इंग्लंडचे पारडे यावेळी जड मानले जात आहे. आतापर्यंत ३ वेळा १९७९, १९८७ आणि १९९२ या साली इंग्लंडच्या संघाने विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
आयसीसी विश्वचषक स्पर्धा ३० मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू होणार आहे. विश्वचषकाची सुरुवात ३० मे'ला यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यापासून होणार आहे, तर स्पर्धेचा अंतिम सामना १४ जुलैला लॉडर्सच्या ऐतिहासिक मैदानावर होणार आहे.