अबुधाबी -गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेने आयपीएलसाठी मुंबईच्या सलामीवीर फलंदाजांची माहिती दिली आहे. आयपीएलच्या तेराव्या सत्रात कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक हे दोन फलंदाज डावाची सुरूवात करतील. अबुधाबी येथे गुरुवारी झालेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत जयवर्धनेने हा खुलासा केला. रोहित शर्माही या पत्रकार परिषदेला उपस्थित होता.
ऑस्ट्रेलियाचा ख्रिस लिनही मुंबईसह सलामी देण्यात तयार आहे. मात्र, जयवर्धनेने रोहित आणि डी कॉकची या स्थानासाठी निवड केली आहे. जयवर्धने म्हणाला, "लीन हा संघात एक चांगला पर्याय आहे. मात्र, रोहित आणि क्विंटनच्या जोडीने गेल्या मोसमात आमच्यासाठी उत्तम कामगिरी केली. ते एकमेकांना चांगले ओळखतात. ते सातत्यपूर्ण आणि अनुभवी आहेत. ते चांगले कर्णधार आहेत. त्यामुळे ते कायम असतील."