मुंबई - श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू आणि आपयीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेने रोहित शर्माचे कौतुक केले आहे. ''रोहित हा नैसर्गिक कर्णधार आहे. तो खूप माहिती गोळा करतो. हे त्याचे बलस्थान आहे'', असे जयवर्धनेने म्हटले.
एका मुलाखतीत जयवर्धने म्हणाला, ''आमच्यात दीर्घ बैठका होत नाहीत. हो, आम्ही बैठका घेतो कारण जेव्हा गोष्टी व्यवस्थित नसतात तेव्हा रणनीती बनवण्याची गरज असते. परंतु रोहित बरीच माहिती संकलित करतो आणि त्याला गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असते. तो याचा उपयोग मैदानावर करतो."
महत्त्वाचे म्हणजे मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी सर्वाधिक चार वेळा विजेतेपद मिळवले आहे. 2019च्या हंगामाच्या अंतिम सामन्यात त्यांनी धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता.
या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही जयवर्धने भाष्य केले. तो म्हणाला, ''चांगल्या फलंदाजीच्या क्रमवारीमुळे भारतीय संघ थोडा वरचढ आहे. भारताची फलंदाजी आणि ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी या दरम्यानची ही मालिका असेल.''
जयवर्धने पुढे म्हणाला, ''कोण दमदार आहे हे सांगणे आता कठीण आहे. दोन्ही संघांमध्ये उत्कृष्ट क्षमता आहे. भारताकडे चांगले गोलंदाज आहेत. ऑस्ट्रेलियाच्या परिस्थितीत ते चांगले प्रदर्शन करू शकतात.''