मुंबई -काही दिवसांपूर्वी भारताचा आघाडीचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. पंजाबने या खेळाडूबद्दल दिल्लीकडे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टची मागणी केली होती. मात्र, दिल्लीने या महत्वाच्या खेळाडूला संघाबाहेर पाठवण्यास नकार दिला. आता ट्रेंट बोल्टला दिल्लीने 'बाय-बाय' केले आहे.
हेही वाचा -चेंडूशी छेडछाड; मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या 'या' खेळाडूवर आयसीसीची बंदी
आयपीएलची सर्वाधिक चार जेतेपदे नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सने बोल्टला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे. १९ डिसेंबरला कोलकाता येथे आयपीएलच्या आगामी हंगामासाठी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. तत्पूर्वी, संघांनी आपल्या खेळा़डूंची अदलाबदल केली आहे. राजस्थान रॉयल्सनेही अंकित राजपूतला किंग्स इलेव्हन पंजाबकडून आपल्या संघात घेतले आहे. राजपूतने २०१८ च्या हंगामात २३ सामन्यांत २२ विकेट्स घेतल्या आहेत.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी दमदार झाली असून त्यांनी २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. बोल्टने २०१४ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. २०१८ व २०१९ मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले. यात त्याने ३३ सामन्यांत ३८ विकेट्स घेतल्या आहेत.