नवी दिल्ली - भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान संघाने बाजी मारली. विराटसेनेने ३४७ धावा फलकावर लावूनही न्यूझीलंडने हा सामना ४ गडी राखून सामना जिंकला. रॉस टेलरने नाबाद शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला सलामीवीर हेन्री निकोलस आणि कर्णधार टॉम लाथम यांची साथ लाभली. दरम्यान, भारताच्या पराभवानंतर माजी फिरकीपटू हरभजन सिंगने दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात महत्त्वाचे बदल करण्याचा सल्ला दिला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना हरभजनने सांगितले की, 'कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या फिरकी जोडीला एकत्र संघात संधी मिळायला हवी. कारण न्यूझीलंडचे फलंदाज वेगवान गोलंदाजांचा सामना सहज करतात. पण फिरकी त्यांची दुखरी बाजू आहे. केदार जाधवला संघाबाहेर करून भारताने आणखी एका फिरकीपटूला संधी द्यायला हवी.'