पुणे - भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने एकदिवसीय क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यात इतिहास रचला. त्याने सातव्या क्रमाकांवर फलंदाजीला येत ३१ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी केली. यात ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. कृणालने त्याचे अर्धशतक केवळ २६ चेंडूत पूर्ण केले.
कृणाल पदार्पणाच्या सामन्यात सर्वात कमी चेंडूत अर्धशतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम इंग्लंडच्या जॉन मॉरिस याच्या नाव होता. त्याने १९९० मध्ये पदार्पण करताना अॅडलेड मैदानावर ३५ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्याचा विक्रम कृणालने मोडीत काढला. इतकेच नव्हे तर कृणाल पदार्पणाच्या सामन्यात सातव्या क्रमाकांवर फलंदाजीला येत अर्धशतक ठोकणारा तिसरा भारतीय ठरला आहे.
भारतासाठी पदार्पणाच्या सामन्यात सात किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत अर्धशतक करणारे खेळाडू -
- ५५ सबा करिम विरुद्ध दक्षिण अफ्रिका, १९९७
- ६०* रविंद्र जडेजा विरुद्ध श्रीलंका, २००९
- ५८* कृणाल पांड्या विरुद्ध इंग्लंड, २०२१
कृणाल एकदिवसीय क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक स्ट्राइट रेटने धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात कृणालने १८७. १० स्ट्राइक रेटने धावा केल्या.