बंगळूरू -आपल्या खराब फॉर्ममुळे टीकेचा धनी बनलेल्या केएल राहुलला अखेर सूर गवसला आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळलेल्या केरळविरुद्धच्या सामन्यात राहुलने दमदार शतक झळकावत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. भारताच्या कसोटी संघातून राहुलला सध्या डच्चू मिळाला आहे.
हेही वाचा -धोनी धावबाद झाला, त्यावेळी रडायचा बाकी होतो - युजवेंद्र चहल
राहुलच्या १३१ धावांच्या खेळीमुळे कर्नाटक संघाने केरळवर ६० धावांनी विजय मिळवला. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना ४९.५ षटकात सर्वबाद २९४ धावा केल्या होत्या. राहुल व्यतिरिक्त कर्णधार मनीष पांडेने अर्धशतकी खेळी केली. राहुलने आपल्या खेळीत १० चौकार आणि ४ षटकार मारले.
कर्नाटकच्या धावांचा पाठलाग करताना केरळचा संघ २३४ धावांवर सर्वबाद झाला. केरळचे सलामीवीर फलंदाज विष्णू विनोद आणि संजू सॅमसन यांनी झुंज दिली खरी पण ते अपयशी ठरले. विनोदने १०४ धावांची शतकी खेळी तर, सॅमसनने ६७ धावा ठोकल्या. हे दोघे फलंदाज बाद झाल्यानंतर, केरळचा संघ विजयापासून दूर गेला.