मुंबई -भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि आयपीएलमध्ये गतवर्षी मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या युवराज सिंगबाबत एक मोठे विधान समोर आले आहे. आयपीएलच्या आगामी मोसमात युवराज नव्या संघाकडून खेळताना दिसू शकतो.
हेही वाचा -कोलकाताने डच्चू दिल्याचे दु:ख नाही, लीनचे स्पष्टीकरण
युवीला आपल्या संघात घेण्यास 'कोलकाता नाईट रायडर्स' हा संघ आतुर आहे. या संघाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर यांनी युवी संदर्भात एक ट्विट केले. 'युवराज, आम्ही लीनला सोडले कारण आम्ही तुझ्यासाठी बोली लावू शकतो! तुम्हा दोघांबद्दल प्रेम आणि आदर!', असे म्हैसूर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
सध्या युवराज अबू धाबी टी-१० लीगमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत युवराज सिंग प्रतिनिधित्व करत असलेल्या मराठा अरेबियन्स संघाकडून खेळताना ख्रिस लीनने मागील खेळीत ९ चौकार व ७ षटकारांसह ३० चेंडूत नाबाद ९१ धावा ठोकल्या. तेव्हा युवीने लीन आणि कोलकाता संघाबाबत एक वक्तव्य केले होते. तो म्हणाला, 'लीनने या सामन्यात आश्चर्यकारक फटके खेळले. त्याने केकेआरला चांगली सुरुवात करून दिली आहे. असे असतानाही केकेआरने त्याला का सोडले हे मला समजत नाही.'
आयपीएल २०२० च्या लिलाव प्रक्रियेआधीच लीन कोलकाता संघातून डच्चू मिळाला आहे. लीनला केकेआरने ९.६ कोटी इतक्या किंमतीत खरेदी केले होते.