नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाबद्दलच्या सर्व चर्चांना आता अंतिम विराम मिळणार आहे. भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक कपिल देव आणि त्यांची समिती भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक ठरवणार असून ही नियुक्ती स्वातंत्र्यदिनापूर्वी होणार आहे
कपिल देव यांच्या समितीत भारताच्या महिला संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचा समावेश आहे. बीसीसीआयच्या (सीओए) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये प्रशिक्षकपदासाठीच्या मुलाखती घेण्यात येणार आहे.
सीओएचे प्रमुख विनोद राय यांनी या नियुक्तीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, 'मुलाखती १३ किंवा १४ ऑगस्टला घेण्यात येणार आहेत. या नियुक्तीमध्ये विराटचे कोणतेही योगदान नसेल. विश्वकरंडक स्पर्धेत झालेल्या कामगिरीबाबत कोणतेही समीक्षण होणार नाही.' प्रशिक्षकपद आणि सपोर्ट स्टाफसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारिख ३० जून आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सध्याचे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडेच राहणार आहे. वेळापत्रकानुसार 3 ते 6 ऑगस्ट या कालावधीत टी-20 मालिका होईल. त्यानंतर 8 ते 14 ऑगस्ट या कालावधीत तीन एकदिवसीय सामने आणि 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी विराटलाच कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.