मुंबई - कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा न्यूझीलंड संघाला झाला आणि न्यूझीलंडचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला. अंतिम सामन्याचे तिकीट पक्के झाल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन जाम खूश असून यावर त्याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
केन विल्यमसन एका क्रीडा युट्यूब चॅनलशी बोलताना म्हणाला की, 'पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणे नक्कीच रोमांचक असेल. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटला चालना मिळेल. ही एक चांगली बाब आहे.'
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा स्थगित केल्याने, कोणताच संघ न्यूझीलंडच्या ७० टक्के गुणाशी बरोबरी करू शकणार नाही. न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना खेळण्यासाठी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एका संघाला संधी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेवर आता सर्व समीकरणे आहेत.