चेन्नई - इंग्लंडचा कर्णधार जो रुटने भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याच्या गोलंदाजीवर, पुढे येऊन षटकार ठोकत द्विशतक पूर्ण केले. रुटचे हे कारकिर्दीतील पाचवे द्विशतक आहे. या द्विशतकासह रुट, कसोटीत सर्वाधिक द्विशतके झळकावणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंच्या यादीत संयुक्तीक दुसऱ्यास्थानी पोहोचला आहे. अॅलेस्टर कुकच्या नावे ५ द्विशतके आहेत. तर वेली हामंड यांच्या नावे ७ द्विशतके आहेत. याशिवाय रुटच्या नावे आणखी एक विक्रमाची नोंद झाली आहे. तो १०० व्या कसोटीत द्विशतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
रुटने सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक झळकावले. त्याचा हा १०० वा कसोटी सामना आहे. तो १०० व्या कसोटीत शतक झळकावणारा नववा फलंदाज ठरला आहे. रुटच्या आधी कॉलिन कौड्रे, जावेद मियाँदाद, गॉर्डन ग्रीनिज, एलेक स्टीवर्ट, इंजमाम-उल-हक, रिकी पॉटिंग, ग्रीम स्मिथ आणि हाशिम आमला यांनी त्यांच्या १००व्या कसोटीत शतक झळकावले आहे.
रूटचा भीमपराक्रम -
रूटसोबत फलंदाजीला आलेल्या स्टोक्सने १० चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली. फिरकीपटू शाहबाझ नदीमने त्याला पुजाराकरवी झेलबाद केले. त्यानंतर आलेला ओली पोप रूटसोबत स्थिरावला. जो रुटने भारताविरुद्ध १४३ व्या षटकात आर अश्विनच्या चेंडूवर षटकार मारत द्विशतक पूर्ण केले. कारकिर्दीतील १००व्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी करणारा रुट जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. आत्तापर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला असा पराक्रम करता आलेला नाही.