अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ४ मार्च ते ८ मार्च या दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याला सुरूवात होण्याआधीच भारतीय संघाला एक मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यातून बाहेर पडला आहे.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. बुमराहने वैयक्तिक कारणाने या कसोटीतून माघार घेतली आहे. याबात त्याने बीसीसीआयला चौथ्या कसोटीत न खेळविण्याची विनंती केली होती. त्याची विनंती बीसीसीआयने मान्य केली आहे. बीसीसीआयने त्याला अहमदाबाद येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघातून मुक्त केले आहे.
दरम्यान, बुमराहच्या बाहेर जाण्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजीचा भार अनुभवी इशांत शर्माबरोबर कोणाच्या खांद्यावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या भारतीय कसोटी संघामध्ये मोहम्मद सिराज, उमेश यादव व इशांत शर्मा हे तीनच वेगवान गोलंदाज आहेत. इशांतबरोबर सिराजला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.