पुणे -सलामीवीर केएल राहुल आणि शिखर धवन आणि त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे भारताने श्रीलंकेचा ७८ धावांनी पराभव केला. पुण्यात रंगलेल्या या तिसऱ्या टी-२० सामन्यात विजय नोंदवून भारताने ही मालिका २-० ने खिशात घातली. या सामन्यात भारताचा 'यॉर्करकिंग' जसप्रीत बुमराहने एक गडी बाद करत टी-२० मध्ये मोठा कारनामा केला.
हेही वाचा -महाराष्ट्राचा 'वीर' यंदाचा क्रिकेट वर्ल्डकप खेळणार!
लंकेचा फलंदाज धनुष्का गुणथिलाकाला बाद करत बुमराहने भारताकडून टी-२० मध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज होण्याचा बहुमान पटकावला. बुमराहच्या खात्यात आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये आता ५३ बळींची नोंद आहे. याआधी, चहल आणि अश्विनच्या नावावर प्रत्येकी ५२ बळी जमा आहेत.
जसप्रीत बुमराहने आपल्या ४५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. तर, युझवेंद्र चहलने ३७ आणि रविचंद्रन अश्विनने ४६ सामन्यात ५२ बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे, बुमराहला आतापर्यंत एकाही सामन्यात ३ पेक्षा जास्त बळी घेता आलेले नाहीत.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी -
- जसप्रीत बुमराह - ५३ विकेट्स.
- चहल आणि अश्विन - ५२ विकेट्स.
- भुवनेश्वर कुमार - ४१ विकेट्स.
- कुलदीप यादव - ३९ विकेट्स.
- हार्दीक पांड्या - ३८ विकेट्स.